welcome to Green Umbrella Organisation

                                                                 

आधुनिक अधोगती  

येत्या २३ जून ला येणारी वटपोर्णिमा सवाष्णीसाठी जरी जिव्हाळ्याचा सण असला तरी पर्यावरणप्रेमींसाठी मात्र मन विषण्ण करणारा अनुभव असतो. पोर्णिमेनंतरचे निदान दोन/तीन दिवस तरी रस्त्यावर पडलेल्या, पायदळी तुडवल्या जाणाऱ्या वटवृक्षाच्या पूजनीय फांद्या व त्यांचे मातीमोल झालेले रूप पाहता आधुनिकता म्हणजेच अधोगती व अज्ञान कि काय असा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही. 


खरं तर भारताची प्राचीन ओळख म्हणजे ज्ञानाची जोपासना करणारा देश अशीच आहे. भारतातील कितीतरी विद्वान, योगी, गुणीजणांनी विश्वाला आपल्या ज्ञान-विज्ञानाने समृद्ध केलं आहे. भारत म्हणजे जीवन जगण्याचाच उत्सव करणाऱ्या व गीतेत शिकवल्या प्रमाणे चराचरामध्ये ईश्वरी रूप शोधणाऱ्या भाविकांचा देश. वर्षातील ३६५ दिवस जीवन-आनंद साजरा करणाऱ्या सण-उत्सवांचा देश जिथे सृष्टीतील प्रत्येक सजीव-निर्जीव रूप पूजनीय आहे, वंदनीय आहे. भारतीयांच्या दैनंदिन जीवनशैली मध्ये जितका सजीव सृष्टीतील प्रत्येक भागीदाराचा समतोल राखला जात असे, तितका जगात अन्यत्र कुठेहि सांभाळला गेला असेल असं निदर्शनास येत नाही.

प्राचीन भारतातील अभ्यासू विद्वानांनी सृष्टीचक्राचा भेद जाणला होता व मनुष्य, प्राणी आणि वनस्पती विश्वाचं अस्तित्व परस्परावलंबी आहे हे ओळखलं होतं. परंतु सृष्टीचा समतोल राखण्यासाठी त्यांना ग्रह-तारे, जीवसृष्टी, ऋतुचक्रपर्यावरणाबद्दल ज्ञात झालेलं उच्चकोटीचं विज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. 
त्यासाठीच भारतातील वैदिक विद्वानांनी शास्त्राला धर्माची जोड देऊन जटील विज्ञानाला भारतीयांच्या दैनंदिन जीवनशैलीचा मुलभूत पायाच बनवून टाकलं. 

अडाणी, अशिक्षित समाजाला त्यांना समजेल अशा भाषेत उच्च ज्ञान देण्यासाठी भावनिक आधाराशिवाय दुसरा पर्याय नव्हता. म्हणूनच कि काय धर्माच्या नावाखाली "भीती" आणि "भक्ती" ह्या दोनच भावनांना हात घालत पर्यावरणाचा समतोल राहील अशी तजवीज केली गेली व भारतातील कोटी कोटी देव-देवतांच्या जोडीला त्यांना आवडणारे प्राणी, पक्षी आणि वनस्पतीही पूजनीय झाल्या. 

आपले धार्मिक सण-उत्सव, व्रत-वैकल्य, यज्ञयाग, कर्मकांड सगळ्यांमध्ये प्राणी-पक्षी, झाडं, पानं, फुलं समाविष्ट केली गेली ज्यायोगे मनुष्य समाज पर्यावरणाची काळजी घेईल. जी झाडं पर्यावरण संवर्धनासाठी अतिशय महत्वाची पण मनुष्याला फळ-फुलं न देणारी अशी वड, पिंपळ, उंबरा विषयी देव किंवा भूत-पिशाच्चाची भिती दाखवून त्यांची हि कत्तल होणार नाही याची सोय केली गेली. 

जगाच्या पाठीवर भारतासारखा देश शोधून सापडणार नाही. सृष्टीतील जे जे मंगल, पवित्र, जीवनदायी आहे अशा सगळ्यानांच मान देऊन त्यांची यथोचित पूजा करणे हा येथील परंपरेचा भाग आहे. 

इथे दगडांचा हि देव होतो. शेतीप्रधान देशात शेतकरी मित्र असलेल्या विषारी नागाची सुद्धा पूजा केली जाते. वर्षभर शेतात राबराब राबणाऱ्या व एरवी हेटाळल्या जाणाऱ्या बैलाची पूजा करून त्याच्या योगदानाबद्दल त्याचे आभार मानणे हे देखील ह्या मातीत एक कर्तव्य व एक उत्सव आहे. किडा-मुंगीला साखर घालणे, पक्ष्यांना दाणे टाकणे, प्राण्यांसाठी आपल्या जेवणातील घास काढून ठेवणे हे भारतातील सामान्य जनतेच्या दिनचर्येचा भाग होता व अजून हि आहे. भारतात गवत ह्या प्रकारात मोडणारी दुर्वा किती पवित्र मानली जाते ह्यावर बाहेरील देशातील कोणाचा तरी विश्वास बसेल काय? अशा ह्या प्राचीन देशात पर्यावरणाशी समतोल राखत जीवन जगणे हा एका पिढीकडून पुढच्या पिढी कडे जाणारा संस्कार होता.  

पर्यावरण सरंक्षण आणि संवर्धनाचा असा उद्दात्त वारसा असलेल्या आपल्या देशात आता मात्र आधुनिक काळात सण-उत्सवांना जे हिडीस स्वरूप येत चाललं आहे ते पाहता संस्कारांचा मूळ हेतू हरवला आहे ह्याची खंत वाटल्याशिवाय राहत नाही.  

शहरीकरणाबरोबर आधुनिकता आली आणि आजच्या धावपळीच्या जगण्यात यांत्रिकीकरण येऊ लागले, ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे वटपोर्णिमा. पतिव्रता सावित्रीचं देणं असलेलं हे व्रत हा एक मंगल संस्कार न राहता यांत्रिक सोपस्कार झाला आहे. 

सावित्रीने आपल्या मृच्छित पतीचे प्राण वाचवण्याकरिता वटवृक्षाचाच आसरा घेतला होता व यमराजाला सत्यवानाला जीवनदान देण्यासाठी भाग पाडलं होतं. तेंव्हापासून सवाष्ण स्त्रिया आपल्या सौभाग्याच्या चिरंतन स्वास्थ्यासाठी व दीर्घायूष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करू लागल्या. 

खरं तर पुराणकाळातील ती बुद्धिमान, विदुषी सावित्री वटवृक्षाचं महात्म्य जाणत होती म्हणूनच तिने मृच्छित सत्यवानाला वडाच्या झाडाखाली झोपवलं कारण ते इतर झाडांच्या तुलनेत सगळ्यात जास्त म्हणजेच जवळ जवळ ६० % प्राणवायू हवेत सोडतं. तिला माहित होतं कि तिच्या मृतवत पतीला त्यावेळेस प्राणवायूचीच सगळ्यात जास्त गरज होती. आधुनिक भाषेत सांगायचं तर वटवृक्ष नैसर्गिक व्हेनटीलेटरचं काम करतो.  

आज मात्र वट-पौर्णिमेला पूजेचा सोपस्कार करणाऱ्या किती स्त्रियांना आपण काय आणि का करत आहोत ह्याची माहिती तरी करून घ्यावीशी वाटते? जर आजच्या तथाकथित सुशिक्षित स्त्रिया वट-पूजेच्या मूळ हेतूचं ज्ञान मिळवतील व वडाच्या झाडाचं पर्यावरणासाठी असलेलं योगदान जाणतील तर खरंच त्या अज्ञानाने झाडाची फांदी तोडून दिवस साजरा करण्याचा हास्यास्पद, अमंगल प्रकार करतील का? 

भारतीयांच्या धार्मिक व सामाजिक जीवनात अढळ स्थान असलेल्या वटवृक्षाला कलियुगात अज्ञानी आधुनिकतेचा शाप लागला आहे, असंच आता म्हणावं लागेल.  

वडाच्या झाडाचं धार्मिक महत्व प्राचीन धर्मग्रंथामध्ये अधोरेखित केलं आहे. भगवान शंकराचं संसारात लक्ष नाही म्हणून रागावलेल्या पार्वतीने त्याला तू वृक्ष होशील असा शाप दिला आणि तो वटवृक्ष झाला असं म्हणतात. महाप्रलय झाल्यावर सगळे चराचर नष्ट झाले तेंव्हा देखील फक्त वटवृक्षच पृथ्वीवर घट्ट पाय रोवून उभा होता. त्याच्या प्रत्येक फांदी, पारंबी, पानातून सूद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो म्हणूनच त्याला अनादि-अनंत असा अक्षयवट म्हटलं गेलं आहे. त्याच्या ह्या कालातीत अस्तित्वामुळेच स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचं साकडं घालतात. गीताजन्माचा एकमेव साक्षीदार म्हणून देखील हा पूजनीय मानतात. त्याच्या अलौकिक गुणधर्मामुळे वडाच्या काड्या होमहवनात किंवा मंगलप्रसंगी अग्नीला अर्पण केली जातात. त्याच्या मंगलदायी गुणधर्मांमुळे  सरपणासाठी त्याची लाकडं वापरणे निषिद्ध मानलं जातं.   

आयुर्वेद शास्त्रात सूद्धा वटवृक्षाला अनन्य साधारण महत्व आहे, कारण त्याच्या मुळं, पानं, फुलं, फळं, साल, पारंब्या, चिक ह्या सगळ्याचाच औषधी उपयोग होतो व असंख्य आजारांवर उपचार करता येतो. भारतीय वैद्यकशास्त्राने ह्या झाडाचे सृष्टीचक्र अखंड गतिशील राहण्यासाठी काय महत्त्व आहे हे ओळखले होते, कारण वीर्य वाढवण्यासाठी व गर्भाशयाच्या शुद्धीसाठी वडापासून रामबाण औषध मिळते, म्हणूनच ह्याला संसारवृक्ष असे हि म्हंटले जाते.  

पर्यावरणशास्त्रामध्ये तर वटवृक्षाचं मोल करता येणार नाही असंच त्याचं कार्य आहे. एक पूर्ण वाढलेलं वडाचं झाड एका तासाला ७१२ किलो इतक्या प्रचंड प्रमाणात प्राणवायू वातावरणात सोडत असते. त्याला आकाराने मोठी व संख्येने भरपूर पानं असल्यामुळे तो जास्तीतजास्त कर्बवायू आणि इतरही अनेक विषारी वायू शोषून घेतो व हवा शुद्ध ठेवतो. उन्हाळ्यात दिवसाला २ टन इतके पाणी बाष्प स्वरूपात बाहेर फेकतो ज्यांचा उपयोग ढग बनण्यासाठी व हवेत आर्दतागारवा निर्माण करण्यासाठी देखील होतो. पावसाळ्यात ढगातील पाणी खेचून घेउन पाउस पाडण्यास मदत करणे हे देखील वडाच्या झाडाचं कार्य आहे. हा वृक्ष सदैव हिरवागार असतो व त्याच्या विशाल आकारामुळे भरपूर सावली देतो. वडाच्या झाडाखाली वेळ व्यतीत करणे म्हणजेच शरीराला आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची पूर्तता भरून काढणे.  

भारतीय समाजजीवनात त्याला कुटुंबप्रमुखासारखे मानाचे स्थान आहे. भारतात कुठेही गेलात तरी देवळाजवळ, गावात सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला वटवृक्ष जपण्याची परंपरा दिसून येईल. तो देखील कुटुंबप्रमुखासारखा अटल, अचल उभा राहून संसाराला जीवन, संरक्षण व सुविधा देण्याचं कर्तव्य बजावत असतो. गावातील कित्येक पिढ्या, लहानथोर त्याच्या अंगावर खेळून मोठी होतात. गावोगावी वडाच्या पारावर बसून आयुष्याच्या संध्याकाळी एकमेकांबरोबर आपली सुखदुख वाटण्यासाठी कितीतरी जेष्ठांना ह्याच विशाल सावलीचा आधार असतो. 

प्राचीन भारतातील परंपरा मानणाऱ्या व आपलं सवाष्णपण शेवटच्या श्वासापर्यंत जपणाऱ्या धार्मिक स्त्रिया अशा ह्या जीवनदायी वृक्षाकडे आपल्या सौभाग्याचं स्वास्थ्य आणि दीर्घायुष्य नाही मागणार तर कोणाकडे मागणार?

खरं तर स्त्रीला सासरच्या उंबरठ्याची लक्ष्मणरेषा आखून दिलेल्या रूढीवादी भारतीय समाजाला तिला वडाची एक फांदी तोडून चार भिंतींच्या आत पूजा करण्याची सक्ती करता आली असती, पण संसार गाड्याला जुंपलेल्या स्त्रीवर्गाला सुध्दा वर्षातून एकदा तरी वटवृक्षाच्या आरोग्यदायी गुणधर्मांचा लाभ व्हावा ह्या हेतूनेच वटसावित्रीचे व्रत घरात न करता गावातील सार्वजनिक ठिकाणी करण्याची परंपरा सुरु झाली.
सासुरवाशीणींना एकदिवस मैत्रिणींसोबत हसत-खेळत वेळ घालवून विरंगुळा मिळावा हादेखील एक हेतू त्यादिवशी साध्य होतो. 
वडाला प्रदक्षिणा घालून प्राणशक्तीला आवाहन करणे, शरीरातील निर्जीव पेशींना शुद्ध प्राणवायू पुरवून सजीव करणे अशा आरोग्याला हितकारी गोष्टींचा ह्या संपूर्ण पूजेत अंतर्भाव केलेला असतो. 

पण आजच्या स्वतःला सुशिक्षित म्हणवणाऱ्या किती माता-भगिनी हे प्राचीन ज्ञान त्यांच्या पुढच्या पिढीला देत आहेत? त्या स्वतःच जर जीवनदायी वृक्षाची तोड-मोड करून, बाजारातील फांदी आणून पूजेचे सोपस्कार उरकणार असतील, तर त्यांच्या लहानग्यांसमोर त्या काय आदर्श ठेवत असतील? आज हि गावातील अशिक्षित स्त्रिया जर झाडाखाली जाऊनच पूजा करत असतील तर मग अशिक्षित कोण आणि सुशिक्षित कोण? 

पतीच्या दीर्घायुष्याची मंगल कामना करताना मात्र एक जीव ओरबाडून आणून व त्याची पूजा करून नंतर त्याला फेकून देणे हा किती विरोधाभास आहे. मांगल्य व पावित्र्याची निशाणी असलेल्या वटसावित्रीच्या व्रताला आलेलं हे आधुनिक स्वरूप त्याचा मूळ आत्मा हरवून बसलं आहे. 

ज्ञानयोगी, कर्मयोगी लोकांच्या भारत देशात आज आधुनिकतेने मात्र कर्मदारिद्र्य आणले आहे. शहरीकरणाच्या नावाखाली शेकडो वर्ष जुनी झाडं कसलाही खेद-खंत न बाळगता समूळ नष्ट केली जात आहेत. रस्तारुंदीकरण करताना हजारो झाडांची कत्तल केली जाते व त्याच संख्येने परत वृक्षारोपण करणे हे आपलं कर्तव्य आहे ह्याची पुसटशीही जाणीव आजच्या तथाकथित सुशिक्षित समाजाला नाही. 

ग्रीन अम्ब्रेला संस्था समस्त माता-भगिनींस आव्हान करते कि एकतर अशाप्रकारे वडाची फांदी तोडून सण साजरा करून नका, त्यापेक्षा वडाचं छोटंसं रोप आणून त्याची पूजा करा आणि अगदीच नाईलाज असेल तर निदान त्या फांद्यांपासून घरच्या कुंडीमध्ये रोपं बनवा, त्यांचं संवर्धन करा व सार्वजनिक ठिकाणी त्यांचं नंतर वृक्षारोपण करा. हे हि शक्य नसेल तर तुम्ही जगवलेली फांद्याची रोपं आमच्या संस्थेला दान करा. 

ग्रीन अम्ब्रेला मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्य करते, जिथे तुम्ही दान केलेली रोपं लावली व जगवली जातील. 

वनस्पती विश्वाने सदैव त्याग आणि समर्पणाने मनुष्य समाजाला जीवनदानच दिलं आहे, आता आपण हि वृक्षारोपणाचं काम करून पर्यावरण संवर्धनाचं आपलं कर्तव्य पार पाडूया.  

- Jyoti Gangurde 

Green Umbrella Organisation